Skip to main content

अशी एक जागा मन मोकळं करायची......

       आपल्या रोजच्या आयुष्यात असे अनेक प्रसंग घडतात ,चांगले-वाईट ,आपल्याला आनंद देणारे प्रसंगी दुःखी करणारे,अगदी साधे किंवा खूप महत्वाचे .हे प्रसंग म्हणजे आपल्या आयुष्यातले असे क्षण असतात ज्यांचा आपण अनुभव घेतलेला असतो व ज्याच्याबद्दल आपल्याला भरभरून बोलायचं असतं, आपलं मन मोकळं करायचं असतं.आता बोलायचं म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येतात माणसं ,आपल्या जवळची ,आपल्याला समजून घेणारी. पण आताच्या technologyच्या युगात जिथे आपलं कोण आणि परकं कोण यातला फरकच समजेनासा झालाय ,संवादच संपत चाललायं तिथे प्रश्न असा पडतो की कोणाशी बोलायचं आणि मन किती मोकळं करायचं.....
              याचा अर्थ सर्व काही मनात साठवून ठेवायचं का? अजिबात नाही.ही वेळ असते अश्या जागा शोधायची जिथे आपण पूर्णपणे व्यक्त होऊ शकतो,जिथे आपल्याला कोणीतरी काही बोलेल याची भीती नसते. मग ती जागा असू शकते आपण स्वतः .इतरांशी बोलण्यासाठी आपण इतके धडपडत असतो की आपला स्व संवादच संपून जातो .बरेचदा इतरांशी बोलून ज्या गोष्टींचा उलगडा होत नाही तो स्वतःशी बोलून होतो.आपल्या बागेतली झाडं ज्यांच्याकडे नुसतं पाहिलं तरी मन प्रफुल्लित होतं .विचार करा रोज घरी आल्यावर बागेत त्या झाडांशी बोलता बोलता एक फेरफटका मारलात तर मन किती हलकं होईल .आपल्या घरातील प्राणी, भाषा वेगळी असली तरी ते आपल्याशी खूप काही बोलत असतात आणि आपलं बोलणं समजूनही घेत असतात. शेवटी ,सर्वात महत्वाचे आपले असे काही छंद जिथे आपण आपलं मन मोकळं करू शकतो. मग ते चित्र रेखाटने असो,डायरी लिहिणं असो, कथा ,कादंबरी,कविता असो.ही सर्व आपलं मन मोकळं करण्याचीच साधनं आहेत,जागा आहेत. फक्त आपण लवकर ओळखायची गरज असते जितकं लवकर आपण ते ओळखतो तितके आपण अधिक हलके होतो आणि नवीन प्रसंगांना सामोरे जातो .
           माणसांशी संवाद नक्की असावा परंतु तो झाला नाही म्हणून मनाला कधी बांधून नाही ठेवायचं.तर त्याला अशा काही जागा शोधून सातत्याने मोकळं करायचं .आयुष्य अधिक सुखकर होईल .......
         
  

Comments