Skip to main content

गोष्ट छोटी डोंगराएवढी

 एका जंगलात एक छोटासा ससा राहत होता. एक दिवस काय झालं जंगलात जोराचा वारा सुटला त्या वाऱ्याने झाडाचे एक पान तुटले , ढोलीत आले आणि सशाच्या डोक्यावर येऊन पडले. ससा मुळातच भित्रा त्यात डोक्यावर पान पडल्यावर तो अजूनच घाबरला आणि जंगलभर ओरडत सुटला की आभाळाचा एक तुकडा माझ्या डोक्यावर येऊन पडला. आभाळ तुटल, धावा, वाचवा! त्याच्याबरोबर त्याने इतर प्राण्यांनासुद्धा घाबरवून सोडलं. शेवटी जंगलातील एका बुद्धिमान प्राण्याने ढोलीत जाऊन पाहिले व खऱ्या गोष्टीची खात्री करून घेतली. 

भित्र्या सशाची ही गोष्ट आपण सर्वांनी ऐकली किंवा वाचली असेल.  या सशाप्रमाणेच आपल्या आजूबाजूला अशी अनेक माणसं असतात ज्यांना छोट्या छोट्या गोष्टी वाढवून सांगायची सवय असते. ज्याला आपण ' पराचा कावळा करणे' किंवा 'राईचा पर्वत करणे' असही म्हणतो. उदा. परीक्षेत १०मार्क जरी कमी झाले तरी," अरे बापरे! माझे  मार्क्स किती कमी झाले! आता माझं खूप नुकसान होणार". अर्धा तास जरी लाईट गेली तरी "अरे देवा! इतका वेळ मी अंधारात कसा राहणार"? अश्या प्रकारच्या प्रतिक्रिया देत असतात. बऱ्याचदा या लोकांच्या तोंडात अरे बापरे! , किती वाईट , भयंकर , असे शब्द ऐकायला मिळतात. थोडक्यात, एखाद्या गोष्टीला जितकं महत्त्व द्यायला पाहिजे त्याहून जास्त महत्त्व देऊन त्याचा स्वतः त्रास करून घेतात व इतरांनाही घाबरवून सोडतात.

अशावेळी आपण थोडावेळ त्या गोष्टीवर विचार करण्याची गरज असते किंबहुना स्वतःला एक प्रश्न विचारण्याची गरज असते. म्हणजेच आता जी गोष्ट घडत आहे किंवा घडली आहे ती खरोखर किती वाईट आहे? नीट विचार केला तर समजेल की मरणाइतकी तर नक्कीच नाही. मरणाइतकी का वाईट नाही, कारण एकदा माणूस मेला की तो काहीही करू शकत नाही. कोणत्याही गोष्टीवर काम करायची त्याची क्षमताच संपून जाते. परंतु जोपर्यंत आपण जिवंत असतो तोपर्यंत कोणत्याही प्रॉब्लेमवर आपण काम करू शकतो. जेव्हा ही गोष्ट आपल्याला समजते तेव्हाच एखाद्या गोष्टीचा जितका आपण त्रास करून घेतो तो  कमी होतो आणि आपण त्या प्रॉब्लेम वर उपाय शोधण्यासाठी प्रयत्न करायला लागतो.

जसे की, परीक्षेत मार्क्स कमी पडले ही गोष्ट जरी वाईट असली तरी मरणाइतकी भयंकर नाही हे जेव्हा आपण स्वतःला सांगणार तेव्हाच ते मार्क्स कसे कमी झाले व पुढे ते कसे वाढवता येतील यावर आपण विचार करणार.



Comments

Post a Comment