निशाला आज खूप अस्वस्थ वाटत होत. कारण अस होत की ती एका कंपनी मध्ये खूप वर्ष काम करत होती. पण काही कारणामुळे तिला ती कंपनी सोडावी लागली. या कंपनी मध्ये तिच्या खूप साऱ्या आठवणी होत्या. खूप काही शिकायला मिळालं होत. चांगले संबंध तयार झाले होते. पण आता तिला परत तिथे जाता येणार नव्हत. म्हणून ती अस्वस्थ झाली होती. काहीतरी निसटल्यासारखं, चुकल्यासारखं तिला वाटत होत.
पुढे काय करायचं हा ही एक प्रश्न होताच. इतक्या वर्षांची सवय, रूटीन सर्वच आता बदलणार. परत नव्याने सर्व घडी बसवायची. या सर्वच गोष्टींचा नाही म्हटलं तरी तिला ताण आलाच होता. या सर्व गोष्टींचा मेळ बसवून परत आयुष्य सुरू करायचं. आपण कुठेतरी अडकु की काय, थांबून जाऊ की काय अशी भीती पण तिला वाटत होती.
एक दिवस निशाची मैत्रीण मिता तिला भेटायला आली. तेव्हा निशाची ही अस्वस्थता तिला जाणवली. तिने त्याचे कारण तिला विचारले. तेव्हा निशाने सांगितले. "मिता, ती पहिली कंपनी होती जिथे मी कामाला सुरुवात केली होती. मला तिथे बरच काही शिकायला मिळालं होत. तिथे माझ्या अनेक आठवणी जोडल्या आहेत. मी जरी कंपनी सोडली असली तरी माझा मन तिथे अडकून आहे. त्यात परत नव्याने काम शोधणे, परत नवीन रूटीन सुरू करणे या गोष्टी पण आहेत. हे सर्व कसं करायचं ते मला समजत नाहीये. मी इथेच अडकून पडेन की काय अस वाटत. म्हणून मन अस्वस्थ होत आहे".
मिता तिला म्हणाली, "अग निशा तू जे सांगत आहेस त्यात चुकीचं किंवा वेगळं काही नाही. एखाद्या ठिकाणी राहिल्यावर त्या जागेचा, त्या माणसांचा लळा लागण, तिथे आठवणी तयार होणं स्वाभाविक आहे. हा माणसाचा गुणधर्म आहे आणि तू जे अडकून पडण्याविषयी म्हणत आहेस तर त्याबद्दल एक विचार कर, तू नदी पहिली आहेस ना! कशी असते सांग ती"? "वाहत असते, खळखळत असते". निशा. "बरोबर! नदी नेहमी वाहत असते. नदीला एक प्रवाह असतो. तिच्या प्रत्येक प्रवाहामध्ये तिला काही ना काही मिळत असत. कधी छान छान मासे, कधी सुंदर वनस्पती तर कधी मोठी मोठी कातळ. पण म्हणून ती कधीतरी कुठे थांबलेली पहिली आहेस का तू? समोर छान मासे असु देत किंवा भलेमोठे कातळ, ती त्या सर्वांसोबत राहून, सर्वांना सोबत घेऊन पुढे जात असते. प्रवाह वाईट असुदे किंवा चांगला, ती कोणामध्येही अडकून पडत नाही. कारण जर पाणी अडकल तर काय होत सांग? "एका जागी साचलेले पाणी खराब होत, दुर्गंधी येणार त्यातून". निशा.
"अगदी खरं, म्हणूनच ही दुर्गंधी येऊ नये यासाठी नदी नेहमी प्रवाहासोबत पुढे जाते आणि हा नवा मार्ग काही दर वेळी सोपा नसतो. मध्ये दगड लागले की त्यांना आपटून जावं लागत, खोल दरी असेल तर त्यातून जावं लागत. पण ती जाते इतकं खर आणि तिच्या या अश्या अखंड जाण्याने ती नेहमी निर्मळ राहते, खेळती राहते".
"निशा आपलं आयुष्य हे या नदीहून काही फार वेगळं नाही ग! आपल्या या आयुष्याचा प्रवाहामध्ये अनेक चांगले वाईट अनुभव, माणसं, आठवणी आपल्याला मिळत जातात. त्या त्या वेळी आपण त्या अनुभवाव्यात. चांगल हसावं, रडाव त्या क्षणाला तिथे जगावं. पण त्याचबरोबर नवीन अनुभवांना, नवीन आठवणी तयार करण्यासाठी पण तयार व्हाव. आपल्या आयुष्याचा हा प्रवाह नेहमी चालू ठेवावा. कारण यात जर अडकून पडलो तर आपल्या आयुष्याला पण एकप्रकारची दुर्गंधी येऊ लागेल. ती यायची नसेल तर मात्र प्रवाहासोबत जावं लागणार. तरच आपलं आयुष्य खळाळत, निर्मळ राहील.
मग होशील ना या तयार आयुष्याच्या या नवीन प्रवाहात सामील व्हायला? त्यातून प्रवास करायला"?
"हो नक्की! तुझ्यासारखे सोबती असतील तर हा नवीन प्रवाह सुरू करायला खूप मला खूप आवडेल".... निशा हसून म्हणाली.
- काव्या गगनग्रास (एम.ए. समुपदेशन मानसशास्त्र)
खुपच छान... प्रवाह सुरु राहिला पाहिजे 😊
ReplyDelete