Skip to main content

अतिविचारांची साखळी कशी तोडाल??

Overthinking म्हणजेच अतिविचार. आताच्या काळात हा शब्द कोणाला माहीत नाही असं नाही. एखाद्या गोष्टीवर, घटनेवर गरजेहून जास्त विचार करत बसणे. इतका की त्यातून आपला मेंदू क्षीण झाला पाहिजे. आता हे आपण सर्वच जाणतो की कोणतीही गोष्ट विचारपूर्वक केली पाहिजे, काही निर्णय घ्यायचा असेल तर त्याआधी काहीतरी विचार केला पाहिजे, सरळसोट लगेच काही ठरवू नये, वेळ घेतला पाहिजे. पण ज्या गोष्टीचा आपण विचार करतो त्यासाठी किती वेळ घालवावा? त्याची मर्यादा किती असावी? आणि हे करून यातून खरंच आपल्याला हवं ते निष्पन्न होतं का? 



दुर्दैवाने अतिविचार म्हणजेच overthinking करणाऱ्या लोकांमध्ये याची जाणीव नसते. त्यांना हे समजतच नाही की इतका विचार करून आपण त्या गोष्टीवर खरंच काहीतरी कृती करण्याची, उत्तर शोधण्याची क्षमताच कमी करून टाकतो. जिथे ज्या गोष्टीवर खरंच काहीतरी action घेणं अपेक्षित असतं तिथे इतका जास्त विचार केला जातो की त्यातून फक्त वेळ आणि आपली शक्ती जाते, त्रास तर होतोच.

विचारांच्या या साखळीत जे आपण अडकतो त्याला rumination म्हणजेच रवंथ करणे म्हणतात. एखाद्या गोष्टीचा चोथा होईपर्यंत त्याला चघळत बसायचं. याची सुरुवात व्हायला देखील एक एक सुरुवात पुरेशी असते. ज्यातून ही साखळी सुरूच होते. ज्यातून चिंता, नैराश्य, निद्रानाश यासारखे आजार होतात.

कारण मेंदूला आरामाच मिळत नाही. मेंदू असल्या गोष्टींमध्ये इतका सक्रिय राहतो की त्याचा झोपेवर वाईट परिणाम होतो. बरं हा अतिविचार असतो कोणत्या गोष्टींचा? तर एकतर होऊन गेलेल्या घटनांचा किंवा मग ज्या अजून घडल्याच नाही त्या गोष्टींचा म्हणजेच भविष्याचा. मी असं कसं केलं? आता या गोष्टी मी कश्या हॅण्डल करू? याने आता अजुनच नुकसान होणार. उद्या मी जाणार तिथे ही गोष्ट नसली तर? माझ्याकडून काही चूक झाली तर? इतकं कर्ज आहे, फेडताच नाही आलं तर? बाहेर जायचं आहे, काय घालू? कसं बोलू? त्यावेळी मी करायला नको होतं? आता यामुळे मी नेहमी बोलणी खाणार.

अगदी शुल्लक गोष्टींपासून ते रिअल लाईफ प्रॉब्लेम्स काहीही असलं तरी त्यावर उपाय शोधण्याऐवजी आपण त्यावर एकसारखा विचार करत बसतो. ज्यातून त्रासाशिवाय काही साध्य होत नाही. म्हणून हे अतिविचार कमी करण्यासाठी, ही साखळी कमी करण्यासाठी आपण काही गोष्टी केल्या पाहिजेत.

१. विचारांना प्रश्न विचारणे: आपण कश्या पद्धतीने विचार करतो यावर आपल्या पुढच्या गोष्टी अवलंबून असतात. अतिविचार करून आपण स्वतःलाच क्षीण करतो आणि म्हणून यांना प्रश्न विचारणं, बदलणं खूप आवश्यक आहे. यासाठी होऊन गेलेल्या गोष्टींवर जेव्हा आपण अतिविचार करतो तेव्हा स्वतःला काही प्रश्न विचारले पाहिजेत. कोणते तर, अमुक एक घटना आता होऊन गेली आहे, माझ्या अश्या विचार करण्याचे त्या घटनेत काही बदल होणारे का? माझं त्या घटनेवर आता नियंत्रण आहे का? मी त्या काळात परत जाऊ शकणारे का? काही चुका जरी झाल्या असतील तरी आता ते होऊन गेलं आहे आणि असं असताना त्यावर आता विचार करून काय चांगलं साध्य होणार आहे? माझ्या हातात आता काय आहे ? तर जे काही झालं त्यातून मी चांगलं काहीतरी शिकू शकतो. त्या चुका परत कश्या होणार नाहीत याची खबरदारी घेऊ शकतो आणि स्वतःला दोष न देता accept करू शकतो.

आता हे झालं होऊन गेलेल्या घटनांबद्दल, जेव्हा आपण न झालेल्या म्हणजेच पुढच्या गोष्टींचा अतिविचार करतो तेव्हा खरंच मी ज्या गोष्टीचा इतका विचार करतोय ती वास्तवात घडली आहे का? माझ्या डोळ्यासमोर आता घडते आहे का? बाकी गोष्टींसारखी मला दिसते आहे का? नसेल तर त्यावर इतका विचार करणं कितपत योग्य आहे? आपल्या डोक्यातले विचार आणि तथ्य यांची जेव्हा आपण पडताळणी करू लागतो तेव्हा आपल्यालाच समजत की खरं काय आहे. अश्या पद्धतीने डोक्यात येणाऱ्या विचारांमध्ये वाहवत न जाता त्यांना प्रश्न विचारले तर ही साखळी तुटू शकते.

२. कौशल्ये आत्मसात करणे: अतिविचार करण्याचं एक महत्त्वाचं कारण म्हणजे निर्णयक्षमतेचा अभाव किंवा कमतरता. आपल्याला नेमकं काय करायचं आहे हेच न समजणे. अगदी छोट्या छोट्या गोष्टींपासून ते महत्त्वाचे निर्णय घेण्यापर्यंत आपलं मन द्विधा मनस्थितीत असतं. हे करू का ते करू? मग हे केल्यावर काय होईल? मग नाहीच केलं तर काय? मग मला जमेलच का? त्यांना आवडेलच का? निर्णयच घेता येत नाही ज्यात आपला वेळ जातो आणि त्रास तर होतोच म्हणून निर्णय क्षमता नीट विकसित केली पाहिजे. त्यासोबत स्व जाणीव विकसित करणे, स्वतःचा आहे तसा स्वीकार करणे या गोष्टी पण खूप गरजेच्या आहेत.

3. दुसरीकडे मन वळवा: आपण कित्येकदा अतिविचारांमध्ये इतके गुरफटतो की आपलं आपल्यालाच भान राहत नाही. म्हणून डोक्यात जेव्हा हे सर्व सुरू होईल तेव्हा जाणीवपूर्वक दुसऱ्या आणि चांगल्या गोष्टीत लक्ष घालायचे. यात आपण चांगलं म्युझिक ऐकू शकतो, बागकाम करू शकतो, चित्र वैगरे काढणे, एखादं चांगलं पुस्तक वाचणे, घरातल्या माणसांसोबत गप्पा मारणे. अश्या गोष्टी ज्यातून डोक्यात चालू असलेलं हे चक्र थांबेल.

४. तज्ञांची मदत घेणे: आता आपल्याला हे समजतय की या गोष्टी आपण खरंच नाही हाताळू शकत, आपल्याला याचा त्रास होतोय. अश्या वेळी चांगल्या मानसोपचार तज्ञांची, समुपकदेशकाची मदत घ्या. यात कोणताही संकोच बाळगू नका. आपल्याला शरीराला काही त्रास झाला तर आपण सुरुवातीला काही घरगुती उपाय करतो, पण काही झालंच नाही तर आपण डॉक्टर कडे जातो. तसच इथे आहे. वेळीच तज्ज्ञाकडे जाऊन यावर मदत घेणे आवश्यक आहे जेणेकरून आपलं पुढचं आयुष्य सुखकर होईल.



Comments

Popular posts from this blog

सतत फोन वाजल्याचा भास होतो...???

कोणाचा फोन आला असेल? थांब हा फोनची रिंग वाजल्यासारखी वाटते पाहतो/ पाहते एक मिनिट. फोन बंद असूनही सारखं कोणाचातरी मेसेज किंवा कॉल आल्यासारखं वाटणं, असा भास होणं आणि त्यामुळे फोन सारखा चेक करत बसणं. सध्या बऱ्याच जणांच्या बाबतीत हे होतंय. तुमच्याही बाबतीत हे असं होत असेल तर दुर्लक्ष करू नका, याचं कारण हा एक आजार आहे. याला 'phantom vibration syndrome' असं म्हणतात. माणसाला उगाचच आपला फोन वाजत असल्याचा भास होतो. वास्तवात तस काही होतंच नसतं. आता याला कारण देखील तशीच आहेत. यातलं महत्त्वाचं कारण म्हणजे फोनचा अतिवापर.  आताच्या काळात अगदी लहान मूल देखील फोनशिवाय राहत नाही. आपला दिवस फोनचे नोटिफिकेशन पाहून सुरू होतो तो तसेच नोटीफिकेशन पाहून बंद होतो. इतकी आपल्याला फोनची सवय झाली आहे. त्याचबरोबर फोनची ठराविक रिंगटोन, मेसेज टोन ही आपल्या मेंदूमध्ये इतकी फीट बसलेली असते की आपल्याला त्याच आवाजाचा भास होतो. त्याचप्रमाणे सतत ऑनलाईन राहणं, कोणाच्यातरी मेसेजची वाट पाहणं यात आपण मानसिकरीत्या इतके गुंतून जातो की ज्यातून आपल्याला फोन नाही वाजला तरी वाजल्याचा भास होतो. संशोधनातूनदेखील हे सिद्ध झाले आह...

बिझी रहा! पण यामध्ये....

आताचा काळच असा आहे की कोणीही पूर्णपणे रिकामं असं नाही. प्रत्येकाचं काही ना काही चालू असतं, कोणत्या ना कोणत्या कामात व्यक्ती व्यस्त आहेच. आता ही व्यस्तता, हे बिझी असणं आपल्यासाठी किती चांगलं आहे, यातून आपल्याला किती फायदा होतो, की आपल्याला या सारख्या व्यस्त राहण्याने त्रास होतो हे आपण नेमकं कोणत्या कामात किती व्यस्त राहतो यावर अवलंबून आहे. कारण हल्ली नुसता फोन चाळत बसण्याला पण बिझी राहणंच म्हणतात. याशिवाय सर्वसामान्यपणे बिझी राहणं याचा संबंध कामाशी जोडला जातो; असं काम जे आपल्या अर्थार्जनाशी जोडलं गेलं आहे, असं जे आपल्या दैनंदिन जीवनाशी जोडलेलं आहे. अश्या कामात आपण व्यस्त असतोच. पण यातून आपल्याला आनंद मिळतो का? दर वेळी मिळतो का? अश्या प्रकारच्या अतिरिक्त कामात, यात जास्त वेळ व्यस्त राहिल्याने आपल्याला त्रास होतो. कारण आपल्या बिझी राहण्याच्या निकषामध्ये हेच सर्व येतं. पण याने त्रास होतो म्हणून रिकामं राहायचं का? काही करायचंच नाही का? तर नाही. आपल्याला हे काम केलच पाहिजे,  पण याशिवाय अश्या वेगवेगळ्या गोष्टींमध्ये आपल्याला बिझी राहायचं आहे, ज्या उपयुक्त असतील, ज्याने आपण व्यस्त पण राहू ...