भले बुरे जे घडून गेले
विसरून जाऊ सारे क्षणभर
जरा विसावू या वळणावर
सुधीर मोघे यांच्या कवितेतल्या या ओळी आपल्याला खूप काही सांगून जातात.
प्रत्येक व्यक्तीला आपलं आयुष्य हे शांत, विना कटकटीच आणि आनंददायी असावं अस वाटत असत. कोणालाही आपल्या आयुष्यात दुःख नको असतात, ओढाताण नको असते. आपल्या मनासारख्या गोष्टी व्हाव्यात यासाठी माणूस आयुष्यभर खटपट करत राहतो, न थांबता झटत राहतो. पण सर्व आपल्या मनासारखं होणार असेल तर ते आयुष्य कसलं? आपल्याला नको असलेल्या गोष्टी, अनपेक्षित घटना या होत राहतात. पण त्यात गुंतून पडून पुढचा मार्ग अजून अडचणीचा करण, होऊन गेलेल्या गोष्टी न स्वीकारता त्यापासून लांब पळण योग्य नाही.
जसं की मनाली, मनाली आणि सुयश हे जवळपास चार वर्ष एका नात्यात होते. काही कारणामुळे हे नात पुढे जाऊ शकले नाही. याचा परिणाम मनालीने स्वतःला त्रास करून घ्यायला सुरुवात केली. सुरवातीचा काही काळ तिला ही गोष्टच मान्य होत नव्हती की नात तुटल आहे. ती स्वतःला सत्य स्वीकारू देत नव्हती, त्यापासून पळून जात होती. एखादी जखम भरून काढण्यासाठी जो एक ठराविक वेळ त्याला द्यायला पाहिजे तो तिला काही केल्या देता येत नव्हता. त्यातून साहजिक मानसिक आणि त्याचा परिणाम म्हणून शारीरिक त्रास व्हायला लागला. इथे खरतर थोडावेळ थांबल पाहिजे. थोडंसं विसावल पाहिजे. परिस्थितीला, स्वतः ला या गोष्टीतून बाहेर पडण्यासाठी थोडा वेळ दिला पाहिजे.
आपलं आयुष्य हे अनेक गोष्टींनी भरलेलं असत. फक्त एका गोष्टीमध्ये स्वतः ला पूर्णपणे गुंतवून न ठेवता, त्यात न फरफटता बाकीच्या गोष्टीमध्ये मन रमवल पाहिजे. त्या क्षणपुरता का होईना दुःखाला विसरता आला पाहिजे.
कोणतीही मॅच असो, एखादा प्रवास असो किंवा अगदी सोप उदाहरण घ्यायचं झालं तर आपण नेहमी करतो ते जेवण असो प्रत्येक गोष्टीत कुठेतरी थांबावं लागतं, थोडा वेळ द्यावा लागतो, घ्यावा लागतो तर पुढील काम नीट होतात. समुद्रात आलेली लाट कितीही मोठी असुदे, सरतेशेवटी ती खाली येते पण तिची वेळ झाल्यावर. तिथे आपण अस म्हणून चालत नाही की ती लाट लगेच खाली आली पाहिजे. तिथे आपण वाट पाहावी लागते. समुद्रात वादळे ही येतच असतात. ती वादळे का आली? त्यांनी येऊच नये असं म्हणून नावाड्याने त्याची होडी त्यात नेली तर त्याचा जीव जाऊ शकतो. म्हणून इथे थोड थांबलं पाहिजे, थोडा विसावा घेतला पाहिजे. गोष्टी त्यांच्या वेळेप्रमाणे पूर्ववत होतात. पण त्यासाठी आपण जरा विसावल पाहिजे.
- काव्या धनंजय गगनग्रास
एम.ए. समुपदेशन मानसशास्त्र
Comments
Post a Comment