आज चार महिने होत आले मी senior citizen group सुरू करून. सुरू केल्यापासून याला चांगला प्रतिसाद मिळाला होता. यात आम्ही वेगवेगळे व्यायाम घ्यायचो, खास त्यांच्यासाठी वेगळे गेम तयार करायचो. अजून बऱ्याच अॅक्टिव्हिटी होत्या जसे की अनुभव कथन, आपल्या आयुष्यातील achievments सांगणे. सर्व जण मनमोकळ करून बोलायची, रमायची. एकंदरीत ग्रुप मस्त चालला होता. पण यात आतापर्यंत माझ्या पाहण्यात आलेली गोष्ट अशी की बरीच जण सर्व अॅक्टिव्हिटी झाल्यावर घरी जायच्या आधी थोडावेळ गप्पा मारण्यासाठी एकत्र बसत. वेगवेगळे विषय निघतच. त्यात एक विषय जास्त असायचा तो म्हणजे सुनांचा विषय. आता सासू लोकांना सूनेविषयी बोलण किती प्रिय असतं सर्वांना ठाऊकच आहे. तर या बोलण्यात चांगल्या गोष्टी कमी आणि गॉसपिंग जास्त असे. म्हणजे माझी सून कशी मला उलटुन बोलते, किंवा घरातलं काम अर्धवट टाकून जाते, सारखी मैत्रिणीसोबत जास्त फिरते एक ना अनेक गोष्टी. ज्या संपतच नसत. जी गत बायकांच्या बोलण्याची तीच पुरुषांची. माझा मुलगा आता माझा राहिला नाही, बायकोचं ऐकतो अश्या गोष्टी. अश्या ह्या गप्पा मी खूप दिवस ऐकत होतो. म्हणून यावर काही उपाय करावा या हेतूने मी एक नवीन अॅक्टिव्हिटी तयार केली.
रोजच्याप्रमाणे सर्व एकत्र आल्यावर मी ती सांगायचं ठरवलं. त्याप्रमाणे आज तो दिवस आला. सर्व जण वेळेत आली. आम्ही आमचा नेहमीचा व्यायाम केला, थोडा वेळ बसलो व नंतर मी पुन्हा सर्वांना एकत्र केलं. त्यांना गोल करून उभ राहायला सांगितलं आणि बोलायला सुरुवात केली. "मित्रांनो, रोज आपण छान छान गेम खेळत असतो, काहीतरी अॅक्टिव्हिटी घेत असतो. त्यात तुमचा उत्साह, सहभाग पण खूप चांगला असतो आणि हा तुमचा उत्साह, सहभाग पाहूनच मी आज तुमच्यासाठी नवीन अॅक्टिव्हिटी घेऊन आलो आहे." माझं बोलणं ऐकून सर्वांचे चेहरे खुलले. सगळेजण विचारू लागले काय आहे सांग, सुरू करूयात. त्यांना थांबवत मी ॲक्टिविटी चं नाव सांगितलं. "तर या ऍक्टिव्हिटी च नाव आहे चला चांगलं बोलूयात." नाव ऐकून सर्व विचारात पडले. सगळ्यांमध्ये कुजबूज सुरू झाली. मी पुन्हा सर्वांना शांत केलं आणि समजावून सांगू लागलो. "ॲक्टिविटीच्या नावातून तुम्हाला समजलं असेल की आपल्याला चांगला बोलायचं आहे. पण ते कोणाबद्दल ते मी आता सांगतो. तर तुम्ही सगळ्यांनी स्वतःच्या सुनेबद्दल आणि स्वतःच्या मुलाबद्दल प्रत्येकी दोन दोन अशा चांगल्या गोष्टी सांगायच्या आहेत." सर्वांचे चेहेरेच बदलले. मी काहीतरी मोठ कठीण सांगितलं आहे असं त्यांचं तोंड झालं होत. पाहायला गेलं तर प्रश्न काही कठीण नव्हता पण त्याच उत्तर सांगायला पण वेळ घ्यावा लागत होता. पण मला ह्याची सुरुवात करायचीच होती म्हणून मी पटापट सर्वांना विचारू लागलो. अडखळत, आठवत का होईना पण सगळे काही ना काही चांगलं सांगत होते. जसे की, माझी सून डोसा सुरेख करते, माझा मुलगा मला जुनी गाणी आवडतात म्हणून त्याच्या कॅसेट घेऊन येतो, त्यादिवशी सून फिरायला गेली होती तेव्हा मला शाल घेऊन आली. हे सर्व त्यांनी आठवत आठवत चेहेऱ्यावर हसू आणत सांगितलं. सगळ्यांना काही दोन दोन गोष्टी सांगता आल्या अस नाही. पण कोणाकडे काहीच सांगायला नव्हत अस मात्र झालं नाही.
अशी ही ॲक्टिविटी आम्ही रोज घेऊ लागलो. सुरुवातीला आठवायला लागणाऱ्या गोष्टी आता आपसूक तोंडात येत होत्या. आणि त्या फक्त दोनच राहिल्या नव्हत्या. याला आता आठवडा होत आला. आणि आज जेव्हा आम्ही याला सुरुवात करणार होतो त्याआधी या सर्व जणांनी मला डोळे बंद करायला लावून एक सरप्राइज दिलं. त्या सर्वांनी एक छान असा पुष्पगुच्छ माझ्यासाठी आणला होता. मी तो घेतला व देण्याचं कारण विचारलं, तेव्हा ते म्हणाले "सर तुमच्या या नवीन ऍक्टिव्हिटी मुळे आमची दृष्टी बदलली. इतके दिवस आम्ही फक्त आमच्या मुलांबद्दल तक्रारी करत होतो, त्यांच्या चुका काढत होतो. पण या अॅक्टिविटी मुळे आम्हाला ही जाणीव झाली की त्यांच्यामध्ये चांगल्या गोष्टी पण आहेत ज्यांच्याकडे आमचं दुर्लक्ष होत होत. त्याच्याकडे आमची डोळेझाक होत होती. पण या गोष्टी आम्ही डोळसपणे पाहू लागलो ते तुम्ही घेतलेल्या या अॅक्टिविटीमुळे. सुरुवती सुरुवातीला आम्ही घरी जाऊन पण आठवत बसायचो की काय चांगलं असू शकत? पण नंतर लक्षात आलं की या साऱ्या गोष्टी रोज आमच्या डोळ्यासमोर घडतच असतात. फक्त आपली तशी दृष्टी हवी. ती तुम्ही मिळवून दिली. खरच आपण किती लवकर माणसालानाव ठेवून त्याच्या चुका काढून मोकळे होतो, पण त्यांच्यातले चांगले गुण सांगायला मात्र कष्ट करावे लागतात. पण हे सर्व तुम्ही सोपं करून दिलं. या सगळ्यातून आम्हाला हे समाधान मिळालं, आमच्या मुलांशी, सूनांशी हे नात अजून चांगल झालं त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार आणि म्हणून ही छोटीशी भेट." खऱ्या अर्थाने मला माझ्या ग्रुप काढण्याचं सार्थक झाल्यासारखं वाटलं.
आता या गोष्टीला अनेक वर्ष होऊन गेली. मी त्यानंतर अनेक ग्रुप काढले, यासारख्या अनेक अॅक्टिविटी तयार केल्या, सगळ्यांकडून काही ना काही मिळालंच. पण ही अॅक्टिविटी आणि ही भेट माझ्या कायम स्मरणात राहील.
काव्या धनंजय गगनग्रास
एम.ए. समुपदेशन मानसशास्त्र
Comments
Post a Comment