Skip to main content

टाळी कधी एका हाताने वाजत नाही...

असं कसं विनाकारण त्याने तुला त्रास दिला, तूच काहीतरी केलं असशील. गोष्टी एका बाजूने कधी होत नसतात आणि टाळी कधी एका हाताने वाजत नाही. काहीतरी केल्याशिवाय का त्याने /तिने असं केलं. भावंडांच्या अगदी साध्या भांडणापासून ते नात तुटायला येईल इथपर्यंत झालेल्या वादात अशी वाक्य आपण सर्रास ऐकतो. टाळी कधी एका हाताने वाजत नाही, थोडक्यात याचा अर्थ कोणतीही गोष्ट घडण्यामागे काही ना काही कारण असतंच. विनाकारण काही होत नसतं. 

पण हे वाक्य खरंच इथपर्यंतच मर्यादित आहे का? अजून कुठे याचा संदर्भ येतो? जरा खोलवर विचार केला तर बऱ्याच ठिकाणी येतो आणि हे आपल्याला समजलं तर आपल्या बऱ्याच समस्या सुटू शकतात, त्यांच्यावर उपाय शोधता येऊ शकतात. कसे ते पाहू...

जेव्हा आपल्यासोबत काहीही घटना घडते, काही प्रसंग घडतात किंवा आपण जेव्हा एखाद्या प्रसंगाला सामोरे जातो तेव्हा त्यातून ज्या आपल्या प्रतिक्रिया येतात त्यांना सर्वस्वी जबाबदार आपण त्या घटनेला, त्या प्रसंगाला ठरवतो. अगदी वरच्या गोष्टींमध्ये पण बहीण/भावाने तसे केले म्हणून मी असा वागलो. त्या वेळी तशी परिस्थिती होती म्हणून मी अशी reaction दिली. इथे पहिली टाळी म्हणून आपण त्या घटनेला जबाबदार ठरवतो.  पण आपण स्वतःला कधी हा प्रश्न विचारला? माझ्या जागी माझे मित्र मैत्रीण असते, तर त्यांनी काय केलं असतं? एखादी तिसरी व्यक्ती असती तर तिने काय केलं असतं? तिने पण अशीच प्रतिक्रिया दिली असती ? अगदी साधं उदाहरण, एका मुव्हीला जाऊनही सर्वांना ती आवडते असं नाही, आवडली तरी प्रत्येकाने एकाच नजरेने पाहिलेली नसते. विचारल्यावर एक छान उत्तर येतं, आमचा pov (point of view) वेगळा होता. 

हेच खर उत्तर आहे. फक्त मूव्ही नाही तर एकंदरीतच आयुष्याकडे पाहण्याचा, प्रत्येक प्रसंगाकडे पाहण्याचा प्रत्येकाचा POV वेगळा असतो आणि म्हणूनच एकाच प्रसंगात प्रत्येकाच्या प्रतिक्रिया वेगवेगळ्या येतात. म्हणूनच एकाला दुःख देणारी घटना दुसऱ्याला देईल असं नाही. याचं कारण विचार वेगळ्या पद्धतीने केलेला असतो. हे समजल्याने दोन गोष्टी होतात. एकतर आपण आपल्या वागण्याची जबाबदारी पूर्णपणे परिस्थितीवर न टाकता स्वतःवर घ्यायला शिकतो आणि दुसरं म्हणजे आपल्याला हे समजत की विचार बदलल्याने आपल्या प्रतिक्रया पण बदलणार आहेत आणि त्यातून आपलाच त्रास कमी होत जातो.

त्यामुळे यापुढे जरी समोरून टाळी आली तरी त्यावर टाळी द्यायची की नाही हे आपण ठरवायचं आहे.




Comments

Popular posts from this blog

सतत फोन वाजल्याचा भास होतो...???

कोणाचा फोन आला असेल? थांब हा फोनची रिंग वाजल्यासारखी वाटते पाहतो/ पाहते एक मिनिट. फोन बंद असूनही सारखं कोणाचातरी मेसेज किंवा कॉल आल्यासारखं वाटणं, असा भास होणं आणि त्यामुळे फोन सारखा चेक करत बसणं. सध्या बऱ्याच जणांच्या बाबतीत हे होतंय. तुमच्याही बाबतीत हे असं होत असेल तर दुर्लक्ष करू नका, याचं कारण हा एक आजार आहे. याला 'phantom vibration syndrome' असं म्हणतात. माणसाला उगाचच आपला फोन वाजत असल्याचा भास होतो. वास्तवात तस काही होतंच नसतं. आता याला कारण देखील तशीच आहेत. यातलं महत्त्वाचं कारण म्हणजे फोनचा अतिवापर.  आताच्या काळात अगदी लहान मूल देखील फोनशिवाय राहत नाही. आपला दिवस फोनचे नोटिफिकेशन पाहून सुरू होतो तो तसेच नोटीफिकेशन पाहून बंद होतो. इतकी आपल्याला फोनची सवय झाली आहे. त्याचबरोबर फोनची ठराविक रिंगटोन, मेसेज टोन ही आपल्या मेंदूमध्ये इतकी फीट बसलेली असते की आपल्याला त्याच आवाजाचा भास होतो. त्याचप्रमाणे सतत ऑनलाईन राहणं, कोणाच्यातरी मेसेजची वाट पाहणं यात आपण मानसिकरीत्या इतके गुंतून जातो की ज्यातून आपल्याला फोन नाही वाजला तरी वाजल्याचा भास होतो. संशोधनातूनदेखील हे सिद्ध झाले आह...

अतिविचारांची साखळी कशी तोडाल??

Overthinking म्हणजेच अतिविचार. आताच्या काळात हा शब्द कोणाला माहीत नाही असं नाही. एखाद्या गोष्टीवर, घटनेवर गरजेहून जास्त विचार करत बसणे. इतका की त्यातून आपला मेंदू क्षीण झाला पाहिजे. आता हे आपण सर्वच जाणतो की कोणतीही गोष्ट विचारपूर्वक केली पाहिजे, काही निर्णय घ्यायचा असेल तर त्याआधी काहीतरी विचार केला पाहिजे, सरळसोट लगेच काही ठरवू नये, वेळ घेतला पाहिजे. पण ज्या गोष्टीचा आपण विचार करतो त्यासाठी किती वेळ घालवावा? त्याची मर्यादा किती असावी? आणि हे करून यातून खरंच आपल्याला हवं ते निष्पन्न होतं का?  दुर्दैवाने अतिविचार म्हणजेच overthinking करणाऱ्या लोकांमध्ये याची जाणीव नसते. त्यांना हे समजतच नाही की इतका विचार करून आपण त्या गोष्टीवर खरंच काहीतरी कृती करण्याची, उत्तर शोधण्याची क्षमताच कमी करून टाकतो. जिथे ज्या गोष्टीवर खरंच काहीतरी action घेणं अपेक्षित असतं तिथे इतका जास्त विचार केला जातो की त्यातून फक्त वेळ आणि आपली शक्ती जाते, त्रास तर होतोच. विचारांच्या या साखळीत जे आपण अडकतो त्याला rumination म्हणजेच रवंथ करणे म्हणतात. एखाद्या गोष्टीचा चोथा होईपर्यंत त्याला चघळत बसायचं. याची सुरुवात ...

बिझी रहा! पण यामध्ये....

आताचा काळच असा आहे की कोणीही पूर्णपणे रिकामं असं नाही. प्रत्येकाचं काही ना काही चालू असतं, कोणत्या ना कोणत्या कामात व्यक्ती व्यस्त आहेच. आता ही व्यस्तता, हे बिझी असणं आपल्यासाठी किती चांगलं आहे, यातून आपल्याला किती फायदा होतो, की आपल्याला या सारख्या व्यस्त राहण्याने त्रास होतो हे आपण नेमकं कोणत्या कामात किती व्यस्त राहतो यावर अवलंबून आहे. कारण हल्ली नुसता फोन चाळत बसण्याला पण बिझी राहणंच म्हणतात. याशिवाय सर्वसामान्यपणे बिझी राहणं याचा संबंध कामाशी जोडला जातो; असं काम जे आपल्या अर्थार्जनाशी जोडलं गेलं आहे, असं जे आपल्या दैनंदिन जीवनाशी जोडलेलं आहे. अश्या कामात आपण व्यस्त असतोच. पण यातून आपल्याला आनंद मिळतो का? दर वेळी मिळतो का? अश्या प्रकारच्या अतिरिक्त कामात, यात जास्त वेळ व्यस्त राहिल्याने आपल्याला त्रास होतो. कारण आपल्या बिझी राहण्याच्या निकषामध्ये हेच सर्व येतं. पण याने त्रास होतो म्हणून रिकामं राहायचं का? काही करायचंच नाही का? तर नाही. आपल्याला हे काम केलच पाहिजे,  पण याशिवाय अश्या वेगवेगळ्या गोष्टींमध्ये आपल्याला बिझी राहायचं आहे, ज्या उपयुक्त असतील, ज्याने आपण व्यस्त पण राहू ...