अगं आई, जरा मला मदत करतेस का? खूप दिवसांपासून लाडू करायचं ठरवत होते पण वेळच मिळत नव्हता. आज कसही करून बनवायचं ठरवलं. पण अग हे काय जमुनच येत नाहीये बघ. आधी व्हिडिओ पाहिला, त्यात कसं मोजून मापून घालतात तसच घातलं. रवा नीट भाजला, तूप, साखर सर्व प्रमाणात पण तरी हे लाडू काही होत नाहीयेत. कंटाळून शेवटी तुला फोन केला. रश्मी एका दमात तिच्या आईशी सर्व बोलत होती.
अगं हो, थांब थांब. जरा श्वास घे आणि माझं ऐक. आपण हे जे पदार्थ बनवतो ते अगदी आपल्या नात्यांसारखे असतात आणि नाती कधी मोजून मापून अगदी तंतोतंत सांभाळली जात नाहीत ग. नात्यांना जोडून ठेवण्यासाठी लागतो साखरेसारखा गोडवा आणि हा गोडवा तुझ्या त्या शुगर फ्री ने किंवा कमी पाकाने येत नाही. त्यासाठी तो पाक चांगला तयार व्हावा लागतो. नाती जोडताना, सांभाळताना घाई गडबड, असंयमी असून कसं होईल? तिथे संयम लागतोच. इथेही तसच आहे. रोज एकमेकांशी केलेलं बोलणं, एकमेकांना दिलेला आधार नात्यांमधला ओलावा टिकवून ठेवतो, त्यांच्यात कोरडेपणा येऊ देत नाही. तो कोरडेपणा येऊ द्यायचा नसेल तर लाडूमध्ये तूप नको का घालायला? जी गोष्ट बांधून ठेवते तिचं कमी केली तर तो पदार्थ तरी कसा तयार होईल? आणि या गोष्टी टेबलस्पूनच्या नसून अंदाजाच्या असतात. नात्यांमध्ये कधी रुसवा फुगवा आला तणाव आला तर आपण प्रयत्न करतो की नाही नीट करण्यासाठी. तसच जर हे चमच्याचे अंदाज चुकत असतील, कमी पडत असतील तर आपल्याकडून प्रयत्न करून तो पदार्थ नीट करायची आपली तयारी लागते. मग त्यासाठी पडूदेत की थोड तूप जास्त. भाजुदेत ना तो रवा चांगला आणि होऊदे ना जरा गोड. नाहीतर मग आहेच ग टिकवायची म्हणून नाती नुसती ढकलण आणि खायचा म्हणून स्वतःच्या समधानाला पदार्थ कसातरी करून खाणं. त्यामुळे परत एकदा हे सर्व बघ. कुठे काय कमी पडलं ते पाहून त्यानुसार ते लाडू कर. मला खात्री आहे की तुला नक्की जमतील कारण तुला नाती चांगली सांभाळता येतात....

Comments
Post a Comment