कोणतही काम नीट व्हायला हवं असेल तर त्यात एकाग्रता खूप महत्त्वाची असते. त्याशिवाय गोष्टी आपल्याला नीट लक्षात येत नाहीत. याचं एकाग्रतेचे महत्त्व पटवून सांगणारी स्वामी विवेकानंदांची ही गोष्ट.
आपल्याला आपल्या आयुष्याकडून नेमक काय हवं आहे, आपल्याला नेमक कोणतं कार्य करायचं आहे याचा शोध घेण्यासाठी स्वामी विवेकानंदांनी १८९०च्या जुलैमध्ये पायीच भारतभ्रमण करायचं ठरवलं. असाच प्रवास चालू असताना नोव्हेंबरमध्ये ते मेरठला आले. त्यांच्याबरोबर इतर संन्यासी बंधुही योगायोगाने त्यावेळी तिथे आले. बऱ्याच दिवसानंतर झालेल्या या भेटीमुळे सर्वानाच आनंद झाला आणि ते एकत्र राहू लागले.
स्वामीजी त्यावेळी मेरठमध्ये अभ्यास करत होते. खूप वाचनही चालू होते. स्वामी अखंडानंदाना ते ग्रंथालयात पाठवत आणि सर जॉन ल्युबक यांच्या समग्र वागमयाचा एकेक ठोकळ्यासारखा खंड घेऊन येण्यास सांगत. दुसऱ्या दिवशी आधीचा खंड परत करायचा आणि नवा घेऊन यायचा. असे बरेच दिवस चालले होते.
त्या ग्रंथालयाचे जे ग्रंथपाल होते त्यांना वाटले की स्वामीजी हे भलेमोठे जाडजूड ग्रंथ वाचतच नसावेत. केवळ लोकांवर छाप पाडण्यासाठी ते रोज एक खंड वाचीत आणि परत करीत असावेत. एके दिवशी स्वामी अखंडानंद खंड बदलून आणायला गेले, तेव्हा त्यांच्याजवळ ग्रंथपालांनी ही शंका बोलून दाखवली. अखंडानंदांनी विवेकानंदांना ती सांगितली.
नंतर काही दिवसांनी स्वामीजी आपणहून ग्रंथपालाकडे गेले आणि त्यांना म्हणाले, मी हे सगळे खंड अत्यंत लक्षपूर्वक वाचले आहेत. आपल्याला जर याविषयी काही शंका असेल असेल तर पुस्तकातील कोणत्याही भागाविषयी आपण मला प्रश्न विचारावेत. त्यावर ग्रंथपालांनी त्यांना बरेच प्रश्न विचारले. स्वामीजींनी त्या सर्वांची अचूक उत्तरे दिली. ग्रंथपाल चकित झाले. कारण असा माणूस त्यांनी कधीही पाहिला नव्हता.
हे कशामुळे शक्य झालं? तर एकाग्रतेने आणि ही एकाग्रता कधी मिळते? जेव्हा आपल्याला आपलं लक्ष्य माहीत असत तेव्हा. आपल्याला नेमकं काय साध्य करायचं आहे हे माहीत असते तेव्हा आपण तिथेच आपलं लक्ष केंद्रित करतो आणि ते मिळवायचं प्रयत्न करतो. जसं अर्जुनाला जेव्हा पक्ष्याचा डोळा फोडायला सांगितला तेव्हा त्याचं लक्ष केवळ त्या डोळ्याकडेच होतं. आजूबाजूच्या कोणत्याही गोष्टीकडे त्याने पाहिलं नाही. तसच आपल्याला काय मिळवायचं आहे हे आपण आधी निश्चित केलं तर आपण त्यावर आपलं मन एकाग्र करू शकतो आणि ती गोष्ट मिळवू शकतो.

Comments
Post a Comment