वरुण गाढ झोपेत होता. अचानक त्याला जाग आली. जाग येण्याचं कारण, त्याला असं वाटू लागलं की आपल्या छातीवर कोणीतरी बसलय. जीव भयंकर घुसमटायला लागलाय, मदतीसाठी हाक मारायचा प्रयत्न केला तरी इंचभर देखील हलता येत नाही की तोंडातून आवाज फुटत नाही. समोर सर्व दिसतंय पण आपण काहीच करू शकत नाही, असं वाटू लागलं जसं काय मेंदू तर जागा आहे पण शरीराला अर्धांगवायू झालाय. हे असं का होतंय याचं कारणच समजत नाही आणि भीती मात्र वाटते. खूप कष्ट केल्यावर जाग येते आणि तेव्हा समजत आपण झोपेतच होतो.
वरूणला आलेला अनुभव नेमका कसला होता? असा अनुभव आपल्यापैकी कोणाला आलाय का? झोपेत झालेल्या या भीतीदायक अनुभवाला म्हणायचं तरी काय ?
स्लीप पॅरालिसिस :
वरुणला आलेल्या या अनुभवाला स्लीप पॅरालिसिस असं म्हणतात. या अवस्थेत आपण स्वत:ला या भयानक अनुभवातून जसे की, उंचावरुन खाली पडणे, शरीराचा एखादा अवयव वेगळा झाल्याचा दिसणे, कोणीतरी अंगावर बसल्याचा भास होणे यातून वाचवण्यासाठी, मदतीसाठी हाका मारतो पण आपला आवाज निघत नाही किंवा आपल्याला जागेवरून हलता देखील येत नाही. एकप्रकारे आपल्या शरीराला पक्षाघात होतो. या अवस्थेत आपल्या मेंदूला गोष्टी कळत असतात पंरतु आपले शरीर हालचाल करायला मागत नाही. एक
हे असं होण्यामागची कारणं कोणती तर,
आपली धावपळीची आणि बदललेली जीवनशैली, ज्यामध्ये कश्याचा काही ताळमेळ राहिलेला नाहीये. सर्व वेळा बदलून गेल्या आहेत. त्यात कामाचा, जबाबदाऱ्यांचा ताण हा आहेच. या सगळ्या बदलत्या जीवनशैलीमुळे अनेकदा लोकांना पुरेशी झोपही मिळत नाहीये. आपल्याला माहीत आहे की झोप शरीराला आणि एकंदरीत मानसिक स्वास्थ्यासाठी किती आवश्यक आहे. त्यात जर काही कमी जास्त झालं तर अनेक समस्या निर्माण होतात ज्यातली एक समस्या म्हणजे स्लीप पॅरालिसिस. झोपेच्या कमतरतेमुळे आरोग्याच्या अनेक समस्या उद्भवू शकतात. निरोगी राहण्यासाठी चांगली झोप खूप महत्त्वाची आहे. स्लीप पॅरालिसिस ही अशीच एक समस्या आहे, जी आजकाल अनेकांना सतावत आहे. सर्व वयोगटातील मुले आणि प्रौढांना हा स्लीप पॅरालिसिस होऊ शकतो. ताण आणि अपुरी झोप हे यामागचे कारण आहेच पण याव्यतिरिक्त निद्रानाश, बायपोलार डिसऑर्डर, नार्कोलेप्सी, चिंता विकार यासारख्या आजारांमध्ये ही समस्या दिसून येऊ शकते.
जरी हा भयानक आजार नसला तरी झोपेच्या समस्येने असा अनुभव आपल्याला येतो. त्यामुळे नीट झोप घेणे, अतिरिक्त ताण न घेणे आणि आपल्या जीवनशैलीत चांगले बदल केल्याने स्लीप पॅरालिसिसची समस्या कमी होऊ शकते.
,_The_Nightmare,_1781.jpg)
Comments
Post a Comment