इसाप चतुरस्त्र कथाकार, कवी आणि विनोदाचा पंडित होता. तो अत्यंत बुद्धिमान होताच, शिवाय द्रष्टा तत्त्ववेत्ताही होता. 'इसापनीती' या नावाने त्याच्या कथा प्रसिद्ध असून दोन-अडीच हजार वर्षांनंतरही त्याच्या कथांची मोहिनी माणसांच्या मनावर कायम आहे.
इसाप झांथसच्या घरी स्वयंपाकी म्हणून काम करत असे. एके दिवशी झांथसने आपल्या मित्रांसाठी मेजवानीचा बेत केला आणि इसापला उत्तम स्वयंपाक करण्याचा हुकूम दिला. इसापने बोकडाच्या जिभेचे नानाप्रकारचे अत्यंत रुचकर पदार्थ तयार केले. सर्व पाहुणे त्या पदार्थांवर तुटून पडले. पण इसापने पदार्थ तयार करताना बोकडाची केवळ जीभ वापरली या गोष्टीचा झांथसला राग आला. त्याने इसापला त्याविषयी विचारले असता इसाप म्हणाला, 'जगात जिभेइतकी चांगली गोष्ट दुसरी कुठलीच नाही.'
दुसऱ्या दिवशी झांथसने पुन्हा मेजवानी आयोजित केली. कालच्याच सर्व मित्रांना त्याने मेजवानीसाठी पुन्हा निमंत्रित केले आणि मुद्दामच मेजवानीसाठी सर्वात वाईट पदार्थ करण्यास इसापला सांगितले. सर्वजण पाहतात तर आदल्या दिवसाप्रमाणेच बोकडाच्या जिभेपासून बनवलेले नानाप्रकारचे पदार्थ ताटात वाढलेले होते. ते पाहून झांथस रागाने तो इसापला म्हणाला, 'अरे, काल तू जीभ सगळ्यात चांगली आहे असे सांगितलेस आणि आज तुला वाईट पदार्थ तयार करण्यास सांगितले तरीही तू तीच जीभ वापरलीस? आज ती वाईट कशी झाली?' तेव्हा इसापने उत्तर दिले, 'मालक, जगात जिभेइतका दुसरा चांगला पदार्थ आणि तिच्याइतका वाईट पदार्थही दुसरा कोणताच नाही.'
झांथस हुशार होता. इसापच्या बोलण्याचा मथितार्थ त्याच्या लक्षात आला. चांगल्या आणि वाईट गोष्टी एकच जीभ करते. प्रेमाचे, जिव्हाळ्याचे, आत्मीयतेचे, स्तुतीचे शब्द जी जीभ उच्चारते, त्याच जिभेतून संतापाची, निंदेची, द्वेषाची, विद्रोहाची भाषा प्रकट होऊ शकते. जीभ मनापासून स्तुती करू शकते आणि तीच जीभ मतलबी हेतूने खोटीनाटी स्तुती करते. जी एखाद्याचा गौरव करते तीच त्याची अप्रतिष्ठाही करू शकते. त्यामुळेच ती दुधारी शस्त्र असते. त्यामुळे जिभेचा वापर फार जपून केला पाहिजे.
पण त्याआधी देखील काही महत्त्वाचं असेल तर ते आहेत आपले विचार. कारण आपण ज्या पद्धतीने विचार करतो त्याप्रमाणे आपलं वागणं, बोलण आणि कृती असतात. विचाराचा प्रभाव आपल्या वर्तनावर, बोलण्यावर पडत असतो. जेव्हा जिभेतून म्हणजेच आपल्या वाणीतून काही चांगलं बाहेर पडत असत तेव्हा तिथे चांगल्या विचारांचा प्रभाव पडलेला असतो.
आणि जेव्हा आपल्या तोंडातून वाईट, नकारात्मक काही बाहेर निघत असत तेव्हा तिथे चुकीच्या विचारांचा प्रभाव जास्त पडलेला असतो. जेव्हा एखादी व्यक्ती रागात बोलत असते तेव्हा तिच्या डोक्यात कुठेतरी समोरच्याने आपल्या मनासारखं वागलच पाहिजे, किंवा वागुच नये अश्या पद्धतीचे विचार असतात, असे आग्रह, अट्टाहास असतात. ते मोडले जातात म्हणून ती व्यक्ती रागावते. अश्या वेळी जर अट्टाहास न करता फक्त इच्छा व्यक्त केली तर रागाची तीव्रता कमी होईल आणि बोलण देखील नीट असेल.
म्हणूनच आपलं बोलण सुधारायचा असेल आणि जीभेचा वापर चांगल्या गोष्टीसाठी करायचा असेल तर आधी विचार बदलायला पाहिजेत. विचारांचा वापर योग्य रीतीने केला तर जीभेचा वापर नीट होईल...
Comments
Post a Comment