अरे तू ते काम करायला घेतलं होतस ना मधे, काय झालं त्याचं आता करत नाहीस का? तू नवीन दुकान चालू केलेलस ना, आता चालवत नाहीस का?
नाही मी केली होती सुरुवात, मला आवडलेले पण ते काम, पण नंतर नंतर नको वाटायला लागलं. काय माहित सुरुवातीला जी मजा येत होती, जो उत्साह होता कामाचा, तो आता नाही वाटत. कामात कशी मजा, एकप्रकारचा उत्साह पाहिजे. त्याशिवाय काय नाही होत. ते नसेल तर काय उपयोग?
सुरुवातीला जोमाने काहीतरी सुरू करून ते अर्ध्यातुन बंद करणं, पुढेच ढकलत राहणं आणि त्यामागची कारण अशी देणं. आपल्यापैकी बऱ्याच जणांसोबत असं होतं. काहीतरी मोठं ठरवणे, करायला घेणे आणि ते असं पुढे जाणे, बंद पडणे. याला 'Behavioural procrastination' असं म्हणतात. ज्याला आरंभशूरता असे म्हणतात. हा असा चालढकलपणा आहे ज्यात व्यक्तीला वाटत की motivation असलं, प्रेरणा असली तरच ते काम पूर्ण करू शकतो, शेवटपर्यंत नेऊ शकतो. त्याशिवाय काही साध्य करता येत नाही, मिळवता येत नाही. कामात प्रेरणा पाहिजेच.
खरंच असं असतं का? तर नाही. कोणतंही काम करण्यासाठी प्रेरणा लागते का? तर नक्की लागते. Motivation अशी ऊर्जा आहे, असा driving force आहे जो आपल्याला काहीही करायला प्रवृत्त करतो, पुढे नेतो. त्यामुळे प्रेरणा हवी का? तर ती पाहिजे. पण हे देखील तितकच खरं आहे की प्रेरणेशिवाय देखील काम पुढे चालू ठेवता येतात, ती पूर्ण करता येतात. कधी ? जेव्हा आपल्याला आपलं अंतिम ध्येय काय आहे? आपलं ultimate goal काय आहे हे माहीत असतं. आणि ते पूर्ण करताना दर वेळी आपण प्रेरित असूच असं नाही. दरवेळी आपल्याला उत्साह असतोच असं नाही. उलट जे आपण करतोय त्यातून आपल्याला चांगलं काहीतरी मिळणार आहे, साध्य होणार आहे हे डोक्यात ठेवून आपण ते काम करत राहिलो तर प्रेरणा नसताना सुद्धा आपण ते पूर्ण करू शकतो. अभ्यास करणे, व्यायाम करणे, आरोग्यासाठी काही गोष्टी जाणीवपूर्वक टाळणे, पुढे जाऊन स्थैर्य यावं म्हणून आता त्यासाठी कष्ट करणे यात दरवेळी उत्साह किंवा प्रेरणा असत नाही, पण तरीही आपण ते करतो, कारण यातून नंतर आपल्याला काय मिळेल याची जाणीव असते, टप्प्या टप्प्याला त्याची जाणीव आपल्याला होत असते, ते आपण अनुभवत असतो. त्यामुळे सुरुवातीला उत्साह होता नाही असं म्हणून ते काम पुढे ढकलण्यापेक्षा त्यातून आपल्याला काय काय मिळतंय, पुढे जाऊन प्रत्यक्षात काय मिळणार आहे याचा विचार केला पाहिजे. असं केलं तर हा चालढकलपणा नक्की कमी होऊ शकतो.

Comments
Post a Comment