नाही रे, मी खरंच वाईट माणूस आहे. काय उपयोग आहे माझा मुलगा म्हणून? काही करू शकत नाही मी माझ्या घरातल्यांसाठी? ना त्यांना काही देता येत, ना कुठे बाहेर घेऊन जाऊ शकतो. काय उपयोग आहे माझा सांग? एक मुलगा म्हणून, नवरा आणि बाबा म्हणून पण मी अपयशी आहे असं वाटतं मला. गिरीश अगदी हताश होऊन रवीला, त्याच्या मित्राला हे सर्व सांगत होता. पण रविलाच माहीत होतं की हे खर नाही. याचं कारण गिरीश जरी स्वतःला आता दोष देत असला, नावं ठेवत असला तरी त्याचे जे काही कष्ट आहेत, आपल्या कुटुंबासाठी तो ज्या पद्धतीने झटत होता ते सर्व रवी पाहत आला होता. कोणाचा आधार नसताना, मदत नसताना त्याने स्वतःच्या बळावर सर्व मिळवलं होतं, तयार केलं होतं. आता एकंदरीत परिस्थितीच अशी होती की काहीवेळा त्याला मुलांच्या गरजा, हौशी इच्छा असूनपण पूर्ण करता येत नसत. आता देखील त्याच्या मुलीला चिन्मयीला सहलीसाठी जायचं होतं. पण फी जास्त असल्याने त्याला तिला पाठवता आलं नाही. त्यामुळे ती हिरमुसून बसली होती. कामातून वेळ काढून घरातल्यांना त्याला फारसा वेळ देता येत नसे, आणि फार कुठे घेऊन जाता येत नसे. या सर्व गोष्टींचं त्याला दुःख होई. पण आज त्याचं हे दुःख बाहेर आलं याचं कारण त्याची मुलगी त्याला रागात तुम्ही चांगले बाबा नाही म्हणाली. कारण तिला सहलीला जाता आलं नाही. लहान मुलं, रुसली की काहीतरी बोलून जातात. पण गिरिशच्या मनाला ते इतकं लागलं की तो स्वतःलाच दोष देऊ लागला.
हे असं गिरीश नाही तर आपल्यापैकी बऱ्याच जणांच्या बाबतीत होतं. कितीही चांगलं करा, गोष्टी व्यवस्थित करा पण एखादी चूक झाली की आपण आपल्या माणूसपणावरच शंका घेऊ लागतो. काही ना काही दोष, नाव ठेवू लागतो. मी नालायकच आहे, मूर्ख आहे, वाईट, worthless आहे असं आपण स्वतःला म्हणू लागतो. खर तर त्या प्रसंगापुरती, गोष्टी किंवा परिस्थितीपुरती आपल्याकडून ती चूक झालेली असू शकते. पण याचा अर्थ आपण पूर्णपणे नालायक किंवा वाईट ठरू का? आपण नीट विचार केला, काही प्रश्न स्वतःलाच विचारले तर हे समजेल की अश्याच प्रसंगांना आपण याआधी कधी ना कधी नीट हाताळलेल आहे. त्यावेळी या गोष्टी नीट पार पडल्या आहेत. तेव्हा आपण स्वतःला खूप हुशार किंवा जेता म्हटलं का? नाही. मग जर एक गोष्ट चांगली करून चांगलं म्हणत नसू तर एक चूक झाली तर आपण पूर्ण वाईट कसे ठरतो. यात काय तर्क आहे आणि यातून आपलं काय चांगलं होतं? उलट असं लेबल लावून आपण आपल्या क्षमतांना अजून कमकुवत करून टाकतो.
हे असं करण्यापेक्षा जेव्हा गोष्टी चांगल्या केल्या तेव्हा नेमकं काय कामी आलं आणि आता जर चुकतात तर कमी काय पडतंय याचा विचार करा. दोष देण्यापेक्षा नेमकं काय चुकतंय, कोणतं कौशल्य कमी पडतंय ते पहा आणि सुधारायचा प्रयत्न करा. सर्व ठीक होण्याच्या शक्यता इथे जास्त आहेत.
Comments
Post a Comment