मी कितीतरी वर्ष झाली असाच/अशीच आहे, माझी सवयच अशी आहे. मी उशिराच उठतो, मला झोपताना पण चहा प्यायची सवय आहे, मी गेली कित्येक वर्ष तंबाखू खातोय. मधे मी सोडायचा प्रयत्न केला नाही असं नाही, पण नाही होत ना! आता इतक्या वर्षांची लागलेली सवय जाणारे का?
खरंच आपल्याला लागलेल्या चांगल्या, वाईट सवयी जाऊ शकतात का? आता चांगल्या सवयी घालविण्याचा प्रश्नच येत नाही. पण ज्या वाईट सवयी आहेत त्या घालविण्याचा जेव्हा मुद्दा येतो तेव्हा हेच म्हटलं जातं की आता जाणारे का ही सवय?
तर याच उत्तर आहे, हो! सवयी बदलता येतात आणि घालवतादेखील येतात. आता ते कसं हे समजून घेण्याआधी ह्या सवयी लागतात कश्या हे समजून घेतलं पाहिजे. आता विचार करा, आपण कोऱ्या कागदावर एखादी रेख मारली. तेवढ्यावरच आपण थांबलो नाही तर त्याला गडद करायला आपण त्यावर अजून पेन्सिल फिरवत राहिलो, ती रेख गिरवत राहिलो. याने काय झालं? ती रेख गडद झाली. इतकी की जेव्हा आपण ती खोडायचा प्रयत्न करतो तेव्हा तो सहजासहजी खोडली जात नाही.
आपल्याला लागलेल्या सवयी ह्या या गडद रेघेसारख्या असतात. कधीकाळी फक्त एक साधी रेघ असतात त्याला गिरवून गिरवून म्हणजेच ते काम पुन्हा पुन्हा सातत्याने करून आपण इतकं गडद करून टाकतो की त्या साध्या कृतीचं सवयीत रूपांतर होतं आणि ती सवय इतक्या वर्षांची असल्याने लगेच जात पण नाही.
आता यामागे अजून एक शास्त्रीय कारण आहे. सवयीची ही जी रेख गडद होते ती अजून कुठे नाही तर मेंदूमध्ये होते. आपल्या मेंदूमध्ये असंख्य न्युरॉन्स कार्यरत असतात. जे आपल्या एकंदरीत व्यक्तिमत्त्वावर प्रभाव पाडत असतात. जेव्हा आपण एखाद काम, कृती सातत्याने करू लागतो तेव्हा या न्युरॉन्सचा पट्टा आपल्या मेंदूमध्ये तयार होतो. जसा की एखादा रस्ता घ्या, जितकं आपण चालणार तितका पक्का होणार. इथेही तेच होतं. याला ' न्युरोपाथवे ' असं म्हणतात.
आपल्या सवयींचे असे न्युरोपाथवे मेंदूमध्ये तयार झालेले असतात जे खूप पक्के असतात. पण यांना कमकुवत करता येतं, कमी करता येतं. याचाच अर्थ आपल्या नको त्या सवयी घालवता येतात. कसं? तर अगदी साधं सोपं आहे. जसं एखादी गोष्ट सतत केल्याने पक्की होते तसच तिला निष्क्रिय करायचं असेल तर याच्या बरोबर उलट करायला लागेल. जर एखादा रस्ता वापरलाच नाही तर तो हळू हळू बंदच पडणार.
तसच या वाईट सवयी घालवायच्या असतील तर यावर उपाय म्हणजे हळू हळू पण सातत्य ठेवून यांना कमी करणे आणि त्याजागी नवीन चांगल्या सवयी लावून घेणे. याने काय होतं आपल्या मेंदूमध्ये नवीन आणि चांगल्या सवयींचा रस्ता तयार होतो, तो पक्का होतो आणि या जुन्या वाईट सवयी कमी होतात, हळू हळू निघून जातात.
आता हे सर्व लगेच होण्यासारखं नसलं तरी अशक्य पण नाही. फक्त जे सातत्य या चुकीच्या सवयी लावून घेण्यात ठेवलं तेच कमी करण्यात ठेवलं की झालं...

Comments
Post a Comment