ए मी नाही येणार हा तिथे, मला अंधाराची भीती वाटते. सूर्यास्त पाहायचा तो पण इतक्या उंचावरुन, तूच जा बाबा. उंच ठिकाणी मला घाबरायला होतं. त्यांचा कुत्रा कसला भयानक आहे, अंगावरच येतो. मला जाम भीती वाटते कुत्र्यांची. सर्वसाधारणपणे, आपल्यापैकी प्रत्येकाला कसली ना कसली भीती ही असतेच. कारण ही भावना अगदी आदिमकाळापासून चालत आलेली आहे आणि आपल्या अस्तित्व टिकवण्याशी संबंधित आहे. एखाद्या गोष्टीने जेव्हा आपल्या जिवाला धोका आहे असे आपल्याला वाटते तेव्हा आपल्या मनात भीतीची भावना निर्माण होते ज्यातून आपण आपला बचाव करण्यासाठी काहीतरी प्रयत्न करतो.
आदिमकाळात हिंस्र पशू, नैसर्गिक धोके यासारख्या गोष्टी, धोके सतत माणूस अनुभवायचा आणि तिथे ही भीतीची भावना त्याला मदत करायची कारण ती रास्त होती.
काळ सरकत गेला, सुरक्षिततेची साधने तयार झाली पण माणसाच्या मनातील भीती काही गेली नाही. आता जसं म्हटलं की भीती ही आपल्या अस्तित्व टिकविण्याच्या संबधित भावना असल्याने तो आपल्यामध्ये असली पाहिजे, पण प्रमाणात.
जिथे भीती असली पाहिजे तिथे असली पाहिजे. कारण ती नसली तर आपण स्वतःचा जीव धोक्यात टाकू आणि त्यामुळेच लहानपणीपासून आपल्या मनात बऱ्याच गोष्टींची भीती घालून ठेवलेली असते. कधी घाबरवयाला, तर कधी त्यापासून वाचायला. अंधार, उंची, खोल पाणी, साप अश्या काही गोष्टी आहेत ज्यांची भीती आपल्यापैकी बऱ्याच जणांना जाणवते आणि म्हणून आपण त्याच्या वाट्याला जात नाही.
इथपर्यंत सर्व ठीक आहे. कारण या भीतीने आपलं काही नुकसान होत नाही, उलट आपण संरक्षित राहतो.
पण, ज्या गोष्टींपासून खर तर धोका होण्याची शक्यता पण नसते आणि असली तरी तिथे पुरेशी संरक्षक साधने आहेत, आपण त्याला पार करू शकतो, थोडक्यात त्यात आपल्या जिवाला काही धोका नाहीये अश्या गोष्टींशी थोडी नाही तर आत्यंतिक भीती वाटणं, इतकी की त्याच्या विचाराने, त्याच्या नुसत्या बोलण्याने अंगाचा थरकाप उडणे, घाम फुटणे, अस्वस्थ व्हायला होणे, त्यापासून जितकं शक्य तितकं लांब जाण्याचा प्रयत्न करणं असं जेव्हा होतं तेव्हा ती फक्त भीती राहत नाही, तर ती होते 'दुर्भिती '. ज्याला भयगंड आणि इंग्लिशमध्ये phobia असं म्हणतात.
भीतीच्या पलीकडची टोकाची भावना, अवस्था ज्यातून एकप्रकारची विकृती निर्माण होते. ज्याला चिंता विकृती म्हणतात. भयगंड किंवा फोबिया हा चिंता विकृतीचा एक प्रकार आहे.
यामध्ये अनेकदा एका विशिष्ट गोष्टीची, कृतीची, वस्तूची, प्रसंगाची, प्राण्याची माणसाला अकारण भीती वाटत असते आणि त्यापासून पळ काढण्यासाठी व्यक्तीची धडपड सुरू होते.
भयगंड होण्याचे कारण मेंदूमध्ये झालेला रासायनिक असमतोल आहे. त्याचप्रमाणे मेंदूतील अमिग्डला (भावनांचे केंद्रस्थान) व हिप्पोकॅम्पस या भागांत येते. पूर्वायुष्यात आलेला एखादा भयंकर अनुभव अश्या पद्धतीने मेंदूत पक्का बसतो की जेव्हा जेव्हा तसाच काही प्रसंग पुन्हा घडणार किंवा तशाच काही गोष्टीला सामोरे जावे लागणार असे वाटते, तेव्हा त्या व्यक्तीला पुन्हा तशाच शारीरिक व मानसिक लक्षणांचा अनुभव येतो जो पूर्वी आला होता. बहुतेक भयगंड हे निरर्थक व अवाजवी असतात. काहीतरी भयानक घडेल असे त्या व्यक्तीच्या मनानेच घेतलेले असते.
जगात शेकडो प्रकारचे फोबिया अस्तित्वात आहेत. ज्यामध्ये बंद जागांची भीती, उंचीची, पाण्याची भीती, गर्दीची भीती आणि एका मुलीला तर चक्क बाहुल्यांची भीती वाटत होती.
यामध्ये व्यक्तीचा श्वास गुदमरतो, आपण मरू की काय अशी भीती वाटते, हात पाय बधीर होतात, अंगाला घाम फुटतो, खूप अस्वस्थ वाटतं.
चिंता विकृतीच्या या प्रकारसाठी अनेक मानसोपचारपद्धती उपलब्ध आहे. ज्यामध्ये systematic desensitization म्हणजेच हळू हळू, पद्धतशीरपणे माणसाच्या मनातील भीतीला कमी करणे, cbt म्हणजेच बोधनिक वर्तन उपचारपद्धती जी माणसाच्या विचार वर्तन भावनांवर काम करते, EMDR तसेच वैद्यकीय उपचार यात वापरले जातात.

Comments
Post a Comment