आपण माणसं आहोत. आता माणूस आहे म्हटल्यावर मन आलं. मनात काय असत तर वेगवेगळे विचार, वेगवेगळ्या भावना आणि या विचार, भावनांच्या आधारे आपण वेगवेगळ्या प्रसंगांना सामोरे जात असतो. तो प्रसंग हाताळत असतो. पण दर वेळी हे विचार किंवा या भावना त्या त्या परिस्थितीत योग्य असतीलच अस नाही. असल्या तरी योग्य प्रमाणात असतील अस नाही.
उदा. अचानक परीक्षा आहे अस सांगितल्या नंतर भीती वाटणं किंवा चिंता वाटणं त्या प्रसंगात योग्य आहे. वाघाची चाहूल लागल्यावर ससा पळून जातो कारण त्याला त्याचा जीव वाचवायचा आहे. त्याने अस नाही केलं तर त्याचा जीव धोक्यात येणार आहे. त्याचप्रमाणे अडचणीच्या प्रसंगात तशा प्रकारच्या भावना व्यक्त करण ही माणसाची प्रवृत्ती आहे.
पण अडचणीच्या प्रसंगात नेमक्या कोणत्या भावना व्यक्त करायच्या म्हणजेच सकारात्मक की नकारात्मक, चांगल्या की वाईट यामध्ये बऱ्याचदा लोकांचा गोंधळ उडतो.
बऱ्याच लोकांना अस वाटत की काहीही झालं, कितीही चांगले वाईट प्रसंग आले तरी आपण सकारात्मक राहील पाहिजे. तश्याच भावना असल्या पाहिजेत. पण सकारात्मक भावना ठेवण म्हणजे चांगल होण नाही. समजा पुरात घर बुडण्याची शक्यता आहे आणि आपण आपल्याला काही होणार नाही अस म्हणून निवांत राहिलो आनंदी राहिलो तर आपलं नुकसान होण्याची शक्यताच जास्त आहे. कारण आपण संकट आल्यानंतर त्याला सामोरे जाण्याची काही पूर्वतयारी केलेली नसेल. म्हणजेच काय तर दर वेळी सकारात्मक भावना चांगली असेलच अस नाही.
बरीच लोकं पेच प्रसंगांमध्ये पूर्णपणे कोलमडतात. काही लोकांना अस वाटत असत की आपण कशाचा काही फरकच पाडून घेऊ नये. पण समोर धोका असताना त्याबद्द्ल उदासीन राहून काहीच न करण हे स्वतःला फसविण्यासारख आहे.
काही जण या नकारात्मक भावनांना इतके कंटाळतात की त्यांना वाटत की ही भावनाच आपल्याला येऊ नये.
थेरपी साठी येणाऱ्या बऱ्याच जणांना अस वाटत असत की हा त्रास आणि त्रास ज्यातून निर्माण होतोय ती भावना पूर्णच निघुन जावी. म्हणजे रागाचा त्रास असेल तर माझा राग पूर्णपणे निघुन जायला पाहिजे. मला अजिबातच चिंता वाटली नाही पाहिजे. मला कसलीच भीती नाही वाटली पाहिजे.
पण हे सर्व शक्य आहे का? दीर्घकालीन आपल्याला फायद्याचं ठरणांर आहे का?
आपल्या श्वासाचा वेग वाढला तर श्वास फुलतो आपल्याला धाप लागते. श्वास कमी झाला तर घुसमट होते आणि श्वास बंद झाला तर काय होईल हे आपल्या सर्वांना माहीतच आहे. म्हणजेच कोणत्याही परिस्थितीमध्ये आपण अस म्हणू शकत नाही की आपण श्वास घेतलाच नाही पाहिजे.
तसच अडचणीमध्ये व्यक्त केलेली नकारात्मक भावना स्वाभाविक जरी असली तरी ती खूप जास्त येणं, कमी प्रमाणात येणं हे आरोग्यदायी नाही, या अनारोग्यादयी नकारात्मक भावना आहेत.
मग काय करायचं जर या सर्व गोष्टी करायच्या नसतील तर? कारण अडचणी तर येणार आहेत, तशा भावना ही येणार. मग यावर काय उपाय असू शकतो? याला काय पर्याय असू शकतो?
तर यावेळी या अनारोग्यादयी नकारात्मक भावनेला आरोग्यदायी आणि उपयोगी अश्या नकारात्मक भावनेत बदलणे
उदा. स्वतःच्या रक्षणासाठी, प्रतीकरासाठी वापरलेला राग. चिंता जास्त झाली तरी वाईट आणि ती घालवली तरी आपलं नुकसान. म्हणून चिंतेला काळजी या नकारात्मक पण उपयोगी भावनेत बदलणे गरजेचं आहे. म्हणजेच परीक्षेत जर चांगले मार्क मिळवायचे असतील तर अभ्यास केला पाहिजे तो नाही केला तर नापास होऊ शकतो हे लक्षात घेऊन अभ्यास करण म्हणजेच काळजी घेऊन काम करणे. स्वतःकडून एखादी चूक झाली तर अपराधी वाटून न घेता त्या चुकीची जबाबदारी घेऊन ती सुधारण गरजेचं आहे. ही जबाबदारी म्हणजे नकारात्मक उपयोगी भावना.
- काव्या धनंजय गगनग्रास. (एम.ए. समुपदेशन मानसशास्त्र)
Mast agdi achuk shabdhat mandni
ReplyDeleteThank u
DeleteThis comment has been removed by the author.
DeleteExcellent dear you alws rock with variety of subjects n your writing is really fresh n positive
ReplyDeleteThanks angha. Means a lot
Delete