नेहमीप्रमाणे मी आणि माझ्या सासूबाई आज देवीच्या दर्शनासाठी मंदिरात जायला निघालो होतो. मंदिरात जाताना आम्ही रिक्षा केली. दोघी छान गप्पा मारत, इकडच्या तिकडच्या गोष्टी करत निघालो. मंदिर आल, आम्ही आवारातून पूजेचं सामान घेतल व आत गेलो. देवीच दर्शन घेतलं आणि थोडावेळ बसून घरी परत यायला निघालो. पण मंदिरातून येताना व्ह्यायच ते झालं. मंदिर जास्त प्रसिद्ध असत ते तिथल्या देवासाठी आणि दुसर म्हणजे काढून ठेवलेल्या चपलांसाठी. कश्या चपला चोरीला जातात, मग काहीवेळा काही अतरंगी लोक कसं दुसऱ्याच चप्पल घालून जातात. एक ना अनेक. आज पण तसच झालं. पण जरा वेगळा प्रकार. म्हणजे गोष्ट चपलाचीच होती पण माझ चप्पल काही चोरीला गेला नाही. झालं असं, आम्ही यायला निघालो; दुपारची वेळ त्यामुळे रिक्षा फार नसतात म्हणून आम्ही चालत यायचं ठरवलं. मंदिराच्या बाहेर दोन पावलं टाकते इतक्यात माझ्या चपलाचा अंगठा तुटला.
सासूबाईंनी ते पाहिलं आणि त्यांच्या बोलण्याची गाडी सुरू झाली. "अरे देवा! चप्पल तुटलं तुझ, आता कशी चालणार आहेस तू. त्यात इथे एक रिक्षा नाही. आताच हे सर्व व्हायचं होत. कठीण होऊन बसलं सर्व. आता काय करायचं आपण? या तुटक्या चपलेने चालायला लागलीस आणि पडलीस म्हणजे." त्यांच्या बोलण्यातून त्यांची माझ्याविषयी असणारी काळजी, प्रेम सर्व दिसत होत. मला त्याविषयी खूप आदर होता. पण त्या ज्या पद्धतीने फक्त अंगठा तुटला म्हणून रिअॅक्ट होत होत्या ते काळजी च्या पलिकडे जात होत.
मी त्यांना समजावलं, "आई माझ पूर्ण चप्पल नाही तर फक्त त्याचा एक अंगठा तुटला आहे. तुमची काळजी मला समजते. पण आई ही इतकी मोठी गोष्ट नाही जितकी तुम्ही समजत आहात. आपण जेवण करताना दोन लोकांच्या जेवणासाठी १०लोकांचं जेवण करतो का?" यावर आई म्हणाल्या, "अग दोन लोकांसाठी दहा जणांच जेवण कश्याला? वाया घालवायला." मी म्हणाले, "बरोबर, तसच आहे हे. पूर्ण चप्पल तुटलं असत तर कदाचित मला चालताना अडचण झाली असती. पण अस झालय का? नाही". अस म्हणून मी माझी पर्स चाळू लागले. मला त्यात एक पिन मिळाली. मी ती काढून त्याने चपलाचा अंगठा जोडला व आईना दाखवत म्हणाले, "आई झाली का अवघड गोष्ट सोपी?"
आई माझ्याकडे पाहत म्हणाल्या, "खरच ग! मी उगाच इतकं टेन्शन घेतल. हे तर किती सोप्पं होत. राईचा पर्वत केला मी." "मी हसून म्हटल, आई तुम्ही खुशाल करा राईचा पर्वत, मी आहे ना तुमच्यासोबत त्याची परत राई करायला." असा हा आमचा परतीचा प्रवास तुटलेल्या अंगठ्याला पुन्हा जोडून सुरू झाला.
मित्रांनो, आपल्या रोजच्या जीवनात अनेक अश्या गोष्टी घडत असतात ज्या अचानकपणे घडतात. ज्याची आपल्याला त्या वेळी खरतर कल्पना नसते. पण कोणती गोष्ट कधी घडेल हे जरी आपल्या हातात नसलं तरी त्यावर वागायचं कसं विचार कसा करायचा हे नक्कीच आपल्या हातात आहे. कोणतीही गोष्ट जितकी घडली आहे, जेवढं तीच महत्त्व आहे तेवढंच तिला द्यावं. अनेकदा आपण विनाकारण गोष्टी आहे त्याहून वाढवतो. ज्याचा त्रास आपल्याला व आपल्या आजूबाजूला असलेल्या लोकांनीही होतो. पायात काटा रुतला तर तो काट्याने काढावा अस म्हणतात. त्याला तलवार घेऊन चालेल का? नाही. कारण ती जखमच इतकी छोटी आहे की त्याला तेवढी छोटी गोष्ट पाहिजे. तसच कोणतही गोष्ट घडली की त्याला पूर्णपणे न वाढवता किंवा पूर्णपणे न कमी करता आहे पाहिजे तेवढ लक्ष देऊन सोडवायचा प्रयत्न करावा. तर समस्या सुटण्याची शक्यता जास्त आहे. बऱ्याचदा गोष्टी नको तितक्या वाढवून आपण अधिकच्या समस्यांना आमंत्रण देतो. कोरोना काळात अनेक लोकांच्या दगावण्याची कारण शारीरिक सोबत मानसिक ही होती. बऱ्याच जणांना शारीरिक लक्षण नसताना, त्यातून ते बरे झालेले असताना ही बर वाटत नव्हता याचा कारण होत अतिप्रमाणात केलेली चिंता. त्या परिस्थितीला त्यांनी मनात इतकं मोठं केलं ज्यामुळे शरीराने बर होऊनही मनात प्रचंड चिंता राहिली, भीती राहिली आणि पुढील गोष्टींना नंतर पुन्हा सामोरं जावं लागलं.
म्हणून जितकं ज्याचं महत्त्व तितकं त्यावर लक्ष देणे, तेवढी त्याची काळजी घेणे केव्हाही योग्य ठरत.
काव्या धनंजय गगनग्रास
एम.ए. समुपदेशन मानसशास्त्र
Khupch chan lihalay
ReplyDeleteThank u angha
Delete